भारतीय वैज्ञानिक

                             

ए.पी.जे. अब्दुल कलाम
शिक्षण
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.
कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..




श्रीनिवास रामानुजन
श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
जन्म व संशोधन
या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
मृत्यु
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.





पांडुरंग सदाशिव खानखोजे
क्रांतिकारक की कृषी शास्त्रज्ञ, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (नोव्हेंबर ७, इ.स. १८८४- जानेवारी १८, इ.स. १९६७) यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.
१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगॉन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.
कृषी शास्त्रज्ञ खानखोजे
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.
मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत 'आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल' असे लिहिले आहे.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वत: शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.
क्रांतिकारक खानखोजे
पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.
आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.
भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले.हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले.पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.
१९५५साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले.

प्रफुल्लचंद्र राय
डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय (मराठी लेखनभेद: प्रफुल्लचंद्र रे; बंगाली: প্রফুল্লচন্দ্র রায় ;) (ऑगस्ट २, इ.स. १८६१ - जून १६, इ.स. १९४४) हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापली.
प्रफुल्लचंद्र रायांनी इ.स. १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधानविषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. इ.स. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर इ.स. १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले. इ.स. १८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी इ.स. १९१६ सालापर्यंत शिकवले. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात पलित अध्यासनावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले.
इ.स. १८९३ साली त्यांनी स्वतःचे भांडवल ओतून बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स वर्क्स हा रसायननिर्मिती उद्योग स्थापला. भारतातील रसायन व औषधनिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ या कारखान्याने रोवली गेली, असे मानले जाते. इ.स. १९०२ साली या कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले.

विक्रम साराभाई
विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
बालपण व शिक्षण
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते.
आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
कारकीर्द
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्सवर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.
मृत्यू
३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.







विजय पांडुरंग भटकर

विजय पांडुरंग भटकर (ऑक्टोबर ११, इ.स. १९४६ - हयात) हे मराठी, भारतीय संगणकशास्त्रज्ञ आहेत.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ. विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून वॉल स्ट्रीट जर्नलनेही बातमी दिली होती.
विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-'अंबाला' ) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली, असे म्हणतात. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकर्‍यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते.
विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९९२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.
भटकरांनी १९९३मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.





सत्येंद्रनाथ बोस

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ
बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.
भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.



स्टीफन हॉकिंग

स्टीफन विल्यम हॉकिंग ( जन्म जानेवारी ८ १९४२[१]) हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आहेत. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे
सुरूवातीचे जीवन आणि शिक्षण
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांना फिलिफा आणि मेरी नामक दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे आहेत. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इसाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते.
स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसीनमध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण "सेंन्ट अल्बान्स स्कूल फोर गर्ल्स" या शाळेत झाले. त्याकाळी गर्ल्स स्कूलमध्ये मुलांनाही प्रवेश मिळे. स्टीफन लहानपणापासून एकपाठी होते. त्यांना संगीत, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलाना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा. पण युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यावेळी गणितासाठी फेलोशिपची सोय नसल्याने हॉकिंग यांनी निसर्गविज्ञान या विषयासाठी प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे आपले नाव नोंदविले.
संशोधन
एकदा लंडनमध्ये खगोलशास्त्रज्ञ रॉजर पेनरोझ यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोझ यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.
स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.
आजार
१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.
स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले. .




होमी भाभा
होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.                                                           

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा